दिवा : कसारा-आसनगावहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल गाड्यांना डोंबिवली व दिवा स्थानकांवरील थांबे रद्द करण्याची मागणी कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी केली आहे. या मागणीला दिव्यातील संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी तीव्र विरोध दर्शवत निषेध केला आहे.
प्रवासी संघटनांनी प्रवाशांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे अपेक्षित असताना, दिवा-डोंबिवलीसारख्या मोठ्या प्रवासी संख्येच्या स्थानकांवरील जलद गाड्यांचे थांबे रद्द करण्याची मागणी करणे हे प्रवाशांच्या अडचणी वाढवणारे असल्याचे भोईर यांनी म्हटले आहे. दिव्यातून दररोज सकाळच्या वेळेत जवळपास दोन लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. तसेच दिवा स्थानकातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे थांबे रद्द करण्याऐवजी पिक अवरमध्ये दिवा-सीएसएमटी अतिरिक्त लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बोरिवली स्थानकाचे उदाहरण देत दिवा-डोंबिवलीतील थांबे रद्द करण्याची तुलना करणे योग्य नसल्याचेही भोईर यांनी सांगितले. बोरिवलीहून चर्चगेटसाठी ज्या प्रमाणात लोकल उपलब्ध आहेत, त्या तुलनेत डोंबिवलीहून सीएसएमटीसाठी तितक्या लोकल आहेत का, याचा अभ्यास करण्याची गरज होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
कसारा-आसनगावहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल दिव्यातूनच पुढे जातात, हे लक्षात घेऊन प्रवाशांच्या हिताचा विचार करावा. दिव्याचा प्रवासी संयमी असला तरी त्याच्या अडचणींच्या जखमेवर मीठ चोळू नये, असा इशाराही भोईर यांनी दिला.






