दिवा : दिवा शहरातील प्रमुख रस्ते व पदपथांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असून वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे विकास इंगळे यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.
दिवा रेल्वे स्थानक परिसर, मुंब्रा देवी कॉलनी रोड, दिवा-आगासन रोड तसेच प्रमुख रस्ते व पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. फेरीवाल्यांमुळे नागरिकांसाठी उपलब्ध असलेली पदपथांची जागा कमी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई केली जाते. मात्र, कारवाईनंतर काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिवा शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून पात्र फेरीवाल्यांसाठी नियोजित फेरीवाला झोन निश्चित व जाहीर करावा, तसेच झोनबाहेर व्यवसाय करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी आहे.
मागण्यांवर तातडीने ठोस कार्यवाही न झाल्यास ठाणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात लोकशाही व सनदशीर मार्गाने धरणे आंदोलन करण्याचा इशाराही विकास इंगळे यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत वंचितचे दिवा सचिव नितेश इंगोले उपस्थित होते.






