दिवा: बेतवडे गावातील शेतकऱ्यांची जमीन विकास करारात गेल्या १० वर्षांपासून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप येथील पीडित शेतकऱ्यांनी केला आहे. या फसवणुकीच्या निषेधार्थ शुक्रवार, १० जुलै २०२६ पासून मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे आंदोलन केले जात आहे. संबंधित मॅरेथॉन बांधकाम व्यावसायिकांनी १० वर्षांपूर्वी बेतवडे गावातील ३५ ते ४० जमीन मालकांसोबत कायदेशीर जमीन विकास करार केला होता, मात्र ठरलेल्या मुदतीत शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उलट, आपल्या जमिनींवर इमारतींचे बेकायदेशीर बांधकाम करून सदनिकांची विक्री देखील करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.
याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ स्तरावर वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दाद मिळाली नसल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसावे लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काही मुख्य मागण्या मांडल्या आहेत. संबंधित मॅरेथॉन बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई व्हावी आणि रजिस्टर करारात ठरलेला मोबदला नुकसान भरपाईसह त्वरित मिळावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच, संपूर्ण मोबदला देईपर्यंत इमारतीचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे आणि सदनिका विकत घेणाऱ्या सामान्य ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी ही बेकायदेशीर विक्री तात्काळ रोखावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण लढ्यात न्याय मिळवण्यासाठी बेतवडे गावातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी सर्व पक्षीय व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.






