ठाणे: जुन्या ठाण्यातील मलनिस्सारण वाहिन्या ५० वर्षे जुन्या असून जर्जर अवस्थेत आहेत. ही अपुरी यंत्रणा बदलण्यासाठी अमृत योजना २ अंतर्गत सुमारे साडेतीनशे कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. पावसाळ्यानंतर या कामास सुरुवात होणार असून दीड ते दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.
जुन्या ठाण्यात ५० वर्षे जुन्या मलनिस्सारण वाहिन्या असून त्या कमी आकाराच्या आणि जर्जर अवस्थेत आहेत. सध्या अवाढव्य वाढलेल्या शहराच्या तुलनेत त्या अपुऱ्या आणि अरुंद ठरत आहेत. त्यामुळे या वाहिन्यांची वारंवार गळती होऊन रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. याबाबत नागरीकांच्या तक्रारी श्री. केळकर यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार श्री. केळकर यांनी या मलवाहिन्या काढून त्याजागी मोठ्या आकाराच्या नवीन वाहिन्या टाकण्यासाठी पाठपुरावा केला होता.
केंद्राच्या अमृत योजना २ अंतर्गत ठाणे महापालिकेला शेकडो कोटींचा निधी मिळाला असून मलवाहिन्यांसाठी सुमारे ३५० कोटींचा निधी मिळाला आहे. या पावसाळ्यानंतर या वाहिन्या बदलण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर या योजनेची माहिती नागरिकांना मिळावी, त्यांच्या याबाबतच्या तक्रारी आणि सूचना प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी श्री. केळकर यांनी खोपट येथील भाजप कार्यालयात संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, हृषीकेश दंडे, उप नगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता नदीम काझी, अनंत बडे, आणि उप अभियंता सुनील सजनानी यांच्यासह ज्या भागातील वाहिन्या बदलण्यात येणार आहेत, त्या भागातील नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी या योजनेची माहिती नागरीकांना दिली तर काही नागरीकांनी भेडसावणाऱ्या समस्या आणि सुचनाही मांडल्या.
याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभागाची गरज विशद केली. पावसाळ्यानंतर या कामास सुरुवात होणार आहे. गेल्या ५० वर्षांत ठाण्याची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून इमारतींसह लोकसंख्याही वाढली आहे. त्या तुलनेत उपलब्ध असलेल्या मलवाहिन्या अपुऱ्या असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही योजना लोकसहभागातूनच यशस्वी होणार असल्याने या बैठकीचे आयोजन केले होते. येत्या दीड दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल, त्यामुळे नागरीकांना दिलासा मिळेल, असा विश्वास श्री. केळकर यांनी व्यक्त केला.






