Homeठाणे-मेट्रोदिवा शहरातील मेडिकल स्टोअरमध्ये फार्मसिस्ट सक्तीच्या नियमाची अंमलबजावणी होत आहे का? ठाणे...

दिवा शहरातील मेडिकल स्टोअरमध्ये फार्मसिस्ट सक्तीच्या नियमाची अंमलबजावणी होत आहे का? ठाणे महापालिकेने पाहणी करावी : नगरसेविका साक्षी मढवी

दिवा शहरातील मेडिकल स्टोअरमध्ये फार्मसिस्ट सक्तीच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याची ठाणे महानगरपालिकेने तात्काळ पाहणी करावी, असा प्रस्ताव नगरसेविका साक्षी मढवी यांनी आगामी महासभेत मांडला आहे.

शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिवा शहरातील बोगस डॉक्टरांचा विषय महासभेत घेतल्यानंतर येणाऱ्या आगामी महासभेत नगरसेविका साक्षी मढवी यांनी दिवा शहरातील औषध विक्री चा विषय चर्चेला आणला आहे. औषध विक्री हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित विषय असून प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये पात्र आणि नोंदणीकृत फार्मसिस्ट उपस्थित असणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र दिवा शहरातील अनेक औषध विक्री केंद्रांमध्ये या नियमाचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी फार्मसिस्टच्या अनुपस्थितीत औषध विक्री होत असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका साक्षी मढवी यांनी महासभेत प्रस्ताव मांडत संबंधित विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

“नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये. पात्र फार्मसिस्टच्या उपस्थितीतच औषध विक्री होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी करून नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी,” असे नगरसेविका साक्षी मढवी यांनी सांगितले.
दिवा शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून ठाणे महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!