दिवा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले. कोकणच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारा जाखडी नृत्याचा कार्यक्रम, गणेशोत्सवानिमित्त कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांसाठी मोफत बससेवेचे तिकीट वाटप आणि भव्य दहीहंडी सोहळा अशा सलग तीन कार्यक्रमांनी दिवेकरांचे लक्ष वेधून घेतले.
शिवसेना दिवा शहराच्या वतीने एस.एम.जी. विद्यामंदिर, दिवा आगासन रोड येथे जाखडी नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणच्या लोकसंस्कृतीचे आणि सामूहिक जीवनाचे प्रतीक असलेल्या या पारंपरिक लोककलेचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे निमंत्रक शिवसेना दिवा शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत दशरथ मढवी होते.
याच ठिकाणी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या मोफत बससेवेच्या उपक्रमाची नोंदणी करण्यात आली. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजित या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या नोंदणी केलेल्या प्रवाशांसाठी मोफत बससेवेची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या दिवेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, शिवानंद प्रतिष्ठान यांच्या वतीने ग्लोबल स्कूल मैदान, दातिवली चौक, दिवा (पूर्व) येथे भव्य दहीहंडी सोहळा २०२६ उत्साहात पार पडला. गोविंदा पथकांच्या थरारक सलामीने कार्यक्रमात रंगत निर्माण झाली. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये, तर महिलांच्या पथकासाठी ६ हजार ७०० रुपये रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. विजेत्या गोविंदा पथकांना रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात आले.
या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना विभागप्रमुख विनोद दशरथ मढवी तसेच नगरसेविका साक्षी रमाकांत मढवी यांचीही उपस्थिती होती.
लोककला, सामाजिक उपक्रम आणि पारंपरिक सण-उत्सव यांचा सुरेख संगम घडवून आणणाऱ्या या तिन्ही कार्यक्रमांमुळे दिवा शहरातील गणेशोत्सवपूर्व वातावरणाला विशेष रंगत आली.






