Homeशहर परिसरदिवा स्टेशन उड्डाणपुलाच्या मंद गती कामावरून भाजप नेते विजय भोईर पालिका अधिकाऱ्यांवर...

दिवा स्टेशन उड्डाणपुलाच्या मंद गती कामावरून भाजप नेते विजय भोईर पालिका अधिकाऱ्यांवर संतापले; ‘बिल्डिंगा का पाडल्या?’ असा थेट सवाल

दिवा: दिवा स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाच्या रेंगाळलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी महापालिका अधिकारी आले असता, भाजप नेते आणि ‘जागा हो दिवेकर’चे अध्यक्ष विजय भोईर यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना संतप्त सवाल विचारत तीव्र आक्षेप नोंदवला.
दिवा स्टेशन परिसरात उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी महापालिकेने पूर्वीच अनेक इमारतींवर आणि बांधकामांवर तोडक कारवाई करून त्या पाडल्या होत्या. मात्र, जागा मोकळी करूनही उड्डाणपुलाचे काम प्रदीर्घ काळापासून संथ गतीनेच सुरू आहे. पाहणीसाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्यांना अडवून विजय भोईर म्हणाले, “जर पुलाचे काम एवढ्या विलंबानेच करायचे होते, तर मग लोकांच्या इमारती आणि घरे तोडून काय साध्य केले? इमारती पाडल्यानंतरही तिथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.”
यावेळी त्यांनी केवळ पालिका कारभारावरच ताशेरे ओढले नाहीत, तर बाधित झालेल्या स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तात्काळ योग्य तो न्याय आणि मोबदला मिळाला पाहिजे, अशी ठाम मागणीही केली. उड्डाणपुलाचे काम तात्काळ गतीने पूर्ण करून दिवा शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करावी, असा इशाराही या प्रसंगी देण्यात आला.

error: Content is protected !!