पालिका आयुक्तांच्या दिवा दौऱ्यात शैलेश पाटील यांची मागणी; साबे रोड व तलाव परिसराचे सर्वेक्षण करण्याची मागणी
दिवा : दिवा स्टेशन परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, रिक्षांची गर्दी आणि फेरीवाल्यांमुळे निर्माण होणारी अडचण लक्षात घेता, भविष्यातील दिवा शहराचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून ठाणे स्थानकाच्या धर्तीवर ‘दिवा सॅटिस प्रकल्प’ राबवावा, अशी आग्रही मागणी नगरसेवक शैलेश पाटील यांनी केली आहे. पालिका आयुक्तांच्या दिवा दौऱ्यादरम्यान स्टेशन परिसरात झालेल्या चर्चेत त्यांनी ही मागणी मांडली.
दिवा शहराची लोकसंख्या आणि स्टेशनचे महत्त्व सातत्याने वाढत असताना वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, शहरातील विद्यमान रस्ते अरुंद असल्याने भविष्यात पारंपरिक पद्धतीने रस्ता रुंदीकरण करणे शक्य होणार नाही. त्याचबरोबर स्टेशन परिसरात बस थांब्यासाठीही सध्या पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर साबे रोड तसेच स्टेशनलगतच्या तलाव परिसराचे सर्वेक्षण करून उपलब्ध जागेचा नियोजनबद्ध वापर करण्याची गरज आहे, असे शैलेश पाटील यांनी सांगितले. ठाणे स्थानकाजवळ ज्या पद्धतीने सॅटिस प्रकल्पाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था, प्रवाशांच्या सुविधा आणि उपलब्ध जागेचा एकत्रित विचार करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर दिवा स्टेशनसाठी स्वतंत्र प्रकल्प उभारल्यास शहराच्या वाहतूक समस्येवर दीर्घकालीन तोडगा निघू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित ‘दिवा सॅटिस’ प्रकल्प दिवा पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाशी जोडल्यास स्टेशन परिसरातच बस थांब्यासाठी जागा निर्माण होऊ शकते. सध्या बस थांबा स्टेशनपासून लांब असल्याने प्रवाशांना तेथे जाण्यासाठी अतिरिक्त अंतर चालावे लागते. स्टेशनला लागूनच बससेवा उपलब्ध झाल्यास रेल्वे आणि बस वाहतुकीचे प्रभावी एकत्रीकरण होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
दिवा स्टेशन परिसरात रिक्षाचालकांची गर्दी, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यांमुळे पादचाऱ्यांनाही चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता भविष्यातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि सार्वजनिक वाहतूक यांचा विचार करून कायमस्वरूपी वाहतूक आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे, असे पाटील यांनी सांगितले.
महापालिकेने दिवा सॅटिस प्रकल्पाच्या दृष्टीने तातडीने सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर आराखडा तयार करावा, प्रस्ताव शासन स्तरावर पाठवून आवश्यक निधी उपलब्ध करून घ्यावा आणि दिवा शहराला वाहतूक कोंडीतून कायमची मुक्तता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी नगरसेवक शैलेश पाटील यांनी केली आहे.






