Homeठाणे-मेट्रोडेडलाईनला हरताळ; दिवा शहरातील नालेसफाई कागदावरच? नाल्यात कचरा आणि गाळ मोठ्या प्रमाणात

डेडलाईनला हरताळ; दिवा शहरातील नालेसफाई कागदावरच? नाल्यात कचरा आणि गाळ मोठ्या प्रमाणात

दिवा प्रभाग समितीचे अधिकारी श्री.परदेशी यांच्या चौकशीची मागणी

सुहास खंडागळे

दिवा:ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्यासाठी दिलेली ५ जूनची डेडलाईन संपली असली, तरी दिवा शहरातील मुख्य नाले अद्याप कचरा आणि गाळाने तुडूंब भरलेले आहेत. पालिका प्रशासनाने दिव्यातील नालेसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, या कामासाठी मंजूर झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठे मुरला, असा संतप्त सवाल आता दिव्यातील सुजाण जनतेकडून विचारला जात आहे. या निष्काळजीपणासाठी दिवा प्रभाग समितीचे कचरा व स्वच्छता विभागाचे अधिकारी श्री. परदेशी कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत त्यांची तात्काळ चौकशी करण्याची मागणी दिवा मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

मुख्य नाले गाळाच्या विळख्यात; कचऱ्याचे ढीग जैसे थे…
पावसाळा तोंडावर आलेला असतानाही दिवा शहरातील मुख्य नाल्यांमधील गाळ अद्याप बाहेर काढण्यात आलेला नाही. नाल्यांची परिस्थिती जैसे थे असून त्यात कचरा साचला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतरही दिवा विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ आणि सुस्त कारभारामुळे मुख्य नाल्यांची स्वच्छता झालेली नाही, हे आता उघड झाले आहे. दिवा प्रभाग समिती अंतर्गत नालेसफाईसाठी एकूण १ कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर कोणतेही काम न दिसल्याने या रकमेचा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय नागरिकांना येत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी श्री. परदेशी यांच्या ढिसाळ कारभारामुळेच दिवा शहर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले असून, आयुक्तांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावरून आता शहरातील विरोधी पक्षांनीही पालिका प्रशासनावर टिकेची झोड उठवली आहे.

अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करा!

दिवा प्रभाग समितीमधील स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांचे मोठे संगनमत आहे. यांच्याच संगनमतामुळे दिव्यातील नालेसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित सर्वांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. दरवर्षी दिवा शहरातील नालेसफाई प्रामाणिकपणे केली जात नाही, परिणामी पावसाळ्यात हजारो सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
— ज्योती पाटील (शहर संघटिका)
शिवसेना ठाकरे गट

मी स्वतः या संदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेतली. ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी जेव्हा दिवा प्रभाग समितीत पाहणीसाठी आले होते, तेव्हा त्यांनी मला दिव्यात ८०% नालेसफाई पूर्ण झाल्याचा खोटा दावा केला. मी जेव्हा त्यांना प्रत्यक्ष नाल्यांच्या ठिकाणी चालून पाहणी दौरा करण्याचे आव्हान दिले, तेव्हा त्यांची पुरती भंबेरी उडाली. यांनी अद्याप कोणतीही नालेसफाई केलेली नाही. यंदा दिव्यातील नालेसफाई केवळ पावसाच्या भरोशावर सोडून अधिकारी मोकळे झाले आहेत. याप्रकरणी संबंधित अधिकारी श्री.परदेशी यांची चौकशी व्हायला हवी.त्यात सत्य समोर येईल.
— प्रशांत गावडे , सरचिटणीस दिवा मनसे

# पालिका प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहतंय का?

दरवर्षी पावसाळ्यात दिव्यात पाणी साचण्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. १ कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर होऊनही जर मुख्य नाले साफ होणार नसतील, तर पहिल्याच मुसळधार पावसात दिवा जलमय होण्याची भीती वर्तवली जात आहे. आता पालिका आयुक्त या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर काय कायदेशीर कारवाई करतात, याकडे संपूर्ण दिवावासीयांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!