Homeसंपादकीयलोकल थांबण्यापूर्वीच सुरू होतो एक थरारक संघर्ष. आधीच तुडुंब भरलेल्या डब्यातून बाहेर...

लोकल थांबण्यापूर्वीच सुरू होतो एक थरारक संघर्ष. आधीच तुडुंब भरलेल्या डब्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारे प्रवासी आणि लोकल पकडण्यासाठी जिवाचे रान करणारे दिव्यातील प्रवासी

सुहास खंडागळे

सकाळी आठ नंतरची वेळ. दिवा रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म…. लोकल येत असल्याची उद्घोषणा होते आणि काही क्षणांतच डोंबिवली-कल्याणकडून येणारी लोकल प्लॅटफॉर्मला लागते. लोकल थांबण्यापूर्वीच सुरू होतो एक थरारक संघर्ष. आधीच तुडुंब भरलेल्या डब्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारे प्रवासी आणि लोकल पकडण्यासाठी जिवाचे रान करणारे दिव्यातील चाकरमानी.. हा दिवा स्थानकावरील रोजचाच थरार, किंबहुना रोजचीच ससेहोलपट!

दिवा, मुंब्रा, कळवा परिसरात गेल्या काही वर्षांत लोकसंख्या झपाट्याने वाढली. मध्यमवर्गीय आणि कष्टकऱ्यांचे हे हक्काचे घर झाले. पण, इथल्या पायाभूत सुविधा आणि विशेषतः रेल्वे प्रवास आजही कठीण आहे. दिवा स्थानकातून दररोज हजारो प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. मात्र, दिवा येथून प्रवाशांना थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी स्वतंत्र लोकल उपलब्ध नाही.

रोज ऑफिसला निघताना घरच्यांच्या डोळ्यात एक अनामिक भीती असते. लोकलमध्ये चढू शकू की नाही, सुखरूप पोहोचू की नाही, याची खात्री नसते,अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका नियमित प्रवाशाने दिली. डोंबिवलीवरून येणाऱ्या लोकलमध्ये दिव्यातील प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. यामुळे अनेकदा जीवघेणे अपघात घडतात, तरुण वयातील प्राण जातात. ही केवळ आकडेवारी नाही, तर काही कुटुंबांचे उद्ध्वस्त होणारे संसार आहेत.

याच पार्श्वभूमीवर, नुकतेच दिवा स्थानक परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास मुंडे व सचिन पाटील यांच्या वतीने एक भव्य स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. एक स्वाक्षरी लाखो प्रवाशांच्या हक्कासाठी हे घोषवाक्य केवळ कागदावर नव्हते, तर ते इथल्या प्रत्येक प्रवाशाच्या वेदनेचा हुंकार होते.

दिवा ते सीएसएमटी थेट लोकल सुरू व्हावी आणि गर्दीच्या वेळी लोकल फेऱ्या वाढाव्यात, या मागणीसाठी हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षऱ्या केल्या. त्या स्वाक्षरी करणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात एकच आशा होती आम्हाला आमचा हक्काचा आणि सुरक्षित प्रवास मिळावा.

दिवा शहरासाठी स्वतंत्र लोकल सुरू होणे ही आता केवळ तांत्रिक मागणी राहिलेली नाही, तर तो इथल्या नागरिकांच्या जगण्याचा आणि मानवी हक्काचा प्रश्न बनला आहे. रेल्वे प्रशासनाने आणि केंद्र शासनाने या हजारो स्वाक्षऱ्यांमागील प्रवाशांची आर्त हाक ऐकण्याची वेळ आता आली आहे.

किती दिवस या मागणीकडे दुर्लक्ष केले जाणार आहे. केवळ कारणे देऊन रेल्वे प्रशासनाला यातून बाजूला होता येणार नाही. जर तुम्ही घाटकोपर रेल्वे स्टेशन वरून स्वतंत्र लोकल सुरू करू शकत असाल तर तशाच पद्धतीने तुम्हाला दिवा येथे आवश्यकता असताना लोकल का सुरू करता येत नाही? असा येथील नागरिकांचा प्रश्न रास्त आहे,असेच म्हणावे लागेल. रेल्वे प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागेल.दिवा शहरातून गर्दीच्या वेळी सकाळ आणि संध्याकाळी स्वतंत्र लोकल सेवा सीएसएमटी साठी सुरू व्हावी ही येथील जनतेची मागणी शासनाने पूर्ण करावी आणि जनतेला न्याय द्यावा. दिव्यातील जनता शासनाचे आभार मानेल.

error: Content is protected !!