Homeठाणे-मेट्रोमद्यपान करून वाहन चालवाल तर...खबरदार !

मद्यपान करून वाहन चालवाल तर…खबरदार !

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बस चालकाला ठाणे वाहतूक पोलिसांचा दणका

९३ शाळांच्या वाहन तपासणीत एका चालकावर गुन्हा

ठाणे :वाहतूक नियमांचे उल्लंघन करून मद्यधुंद अवस्थेत शालेय बस चालवणाऱ्या चालकांवर ठाणे शहर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील शाळांना वाहतूक पोलिसांनी अचानक भेटी देऊन ३६६ चालकांची ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणी केली. यामध्ये अंबरनाथ येथील एका खासगी शाळेच्या बस चालकांवर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला असून मद्यपान करून शालेय वाहन चालवाल तर खबरदार…असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मद्यपी वाहन चालकांमुळे अपघातांची शक्यता अधिक असते. अशातच मद्य प्राशन करून शालेय वाहने चालविणाऱ्या चालकांमुळे विद्यार्थ्याच्या जीविताला धोका वाढत आहे. या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सुमारे ९३ शाळांना वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी अचानक भेटी दिल्या. सकाळी ७ ते ९ या वेळेत राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत ३७० बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये बॅज, युनिफॉर्म, वाहनांचे पीयूसी, इन्शुरन्स त्याचप्रमाणे बसमधील सीसी टिव्ही कॅमेऱ्याची देखील तपासणी करण्यात आली. तसेच तब्बल ३६६ चालकांची ड्रंक अँड ड्राईव्ह चाचणी करण्यात आली. यात अंबरनाथ पश्चिम येथील फादर अँग्नल स्कूलचा बस चालक मद्य पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. बाबा मंजिरी (वय २६) असे बस चालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“शालेय वाहनांच्या चालकांकडून मद्यपान करून वाहन चालवणे अत्यंत धोकादायक आहे. शाळांनी आपल्या चालकांची दररोज किंवा आठवड्यातून किमान एकदा ‘ब्रेथ ॲनालायझर’ द्वारे तपासणी करावी. विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.”
• पंकज शिरसाट ( वाहतुक उप आयुक्त )

पालकांनी सतर्क राहावे :शालेय बस चालकाचे वर्तन संशयास्पद किंवा मद्य पिल्याचा संशय आल्यास पाल्यांना वाहनांमध्ये बसवू नये.
वाहन चालकाचे गैरवर्तन आढळल्यास तात्काळ शाळा प्रशासन आणि ११२ नंबरवर पोलिसांकडे तक्रार करावी.

error: Content is protected !!