ठाणे : ठाण्यासह सहा जिल्ह्यातून १८ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या ठाण्याच्या तुळशीधाम येथे राहणाऱ्या रोहन सत्यवान हजारे (वय २६)
गुन्हेगाराला ताब्यात घेत त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. विक्रीच्या उद्देशाने हे अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हद्दपार करण्यात आलेला रोहन हा अग्निशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वागळे युनिट-५ च्या पथकाने जुनी बिअर कंपनीसमोरील रस्त्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचे मॅगझिनयुक्त लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हजारे हा चितळसर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याला ४ जुलै २०२५ पासून ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यांच्या हद्दीतून १८ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले होते.
मात्र, सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता तो ठाणे शहरात प्रवेश केल्याचे तसेच शस्त्रबंदी आदेश लागू असताना अग्निशस्त्र बाळगल्याचे उघड झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम १४२, ३७(१) आणि १३५ अन्वये वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील करीत आहेत. पोलिस सहआयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.






