दिवा : खिडकाळी येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ८९ मध्ये गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेच्या पाणीपुरवठ्याची नळजोडणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर शाळेला पाणी जोडणी देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
या समस्येबाबत १२ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्याने मनसेचे जिल्हासंघटक तुषार पाटील, विधानसभा सचिव शरद पाटील आणि शहर अध्यक्ष प्रशांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका मुख्यालयात कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आणि शिक्षण अधिकारी ओमकार बजागे यांची भेट घेण्यात आली.
यावेळी पाणीपुरवठा विभागाने तातडीने नळजोडणीची कार्यवाही केली. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शाळेला अखेर पाणी जोडणी मिळाली असून, अंधार झाल्याने शाळेपर्यंत पाईप टाकण्याचे उर्वरित काम दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी विभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम आणि शाखाध्यक्ष सचिन चव्हाण उपस्थित होते. “प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा” असा संदेश देत जयेश घरत यांनी या पाठपुराव्याबाबत माहिती दिली.






