दिवा:- घरातील माणसं रविवार असल्याने फिरायला बाहेर गेली असताना ही संधी साधून चोरट्यांनी बंद असणाऱ्या घराच्या खिडकीतून प्रवेश करून दागिने व रोख रक्कम चोरल्याची घटना दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी परिसरात घडली. या भागात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रविवारी गुरूदर्शन नगर येथील हरिश्चंद्र अपार्टमेंट परिसरात चोरीची घटना उघडकीस आली असून सांकेत भारद्वाज उर्फ समीर भाई यांच्या घरात चोरट्याने घुसून सोन्याच्या चैन,अंगठी व 36 हजाराची रोख रक्कम लंपास केली. भारद्वाज कुटुंबीय रविवार असल्याने दुपारनंतर मुंबई येथे फिरायला गेले होते. रात्री साडेअकरा नंतर ते घरी आले असता आपल्या घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. याबाबत भारद्वाज यांनी दिवा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. दिव्यात चोऱ्या वाढल्याने नागरिकात भीतीचे वातावरण असून चोरट्यांचा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिक करत आहेत.