दिवा:- दिवा शहर भाजपच्या सरचिटणीस असलेल्या युवराज यादव यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला देत पक्षाच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.युवराज यादव यांच्या राजीनामामुळे पुन्हा एकदा दिवा भाजपमधून पदाधिकारी सोडून का जातात या चर्चेला उधाण आले आहे .
दिवा शहर भाजपचा उत्तर भारतीय चेहरा असणारा पदाधिकारी कोणतेही राजकीय कारण नसल्याचे सांगत राजीनामा देत असल्याने दिवा शहर भाजप मधील अंतर्गत नाराजी दोन वर्षात कमी झाली नाही का असा सवाल ही आता उपस्थित होऊ लागला आहे.मागील अडीच वर्षात दिवा भाजप मधील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. दिवा भाजप संघटनेवर संघटनात्मक पकड असणारे तत्कालीन मंडळ अध्यक्ष आदेश भगत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ तरुण नेतृत्व असणारे नवे मंडल अध्यक्ष निलेश पाटील यांनीही दिवा भाजपला अवघ्या महिन्याभरातच रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेले मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे हे शिवसेना शिंदे गटा विरोधात आक्रमक भूमिका घेत असताना पक्षाने मंडळ अध्यक्ष पदावरून त्यांना दूर केल्यानंतर त्यांनीही पक्षाचा राजीनामा देत शिवसेना ठाकरे गटाचा झेंडा हातात घेतला होता. हे चक्र अजूनही थांबण्याचे नाव नाही.दरम्यान दिवा भाजप मधील जुने जाणते आणि कट्टर कार्यकर्ते असणारे युवराज यादव यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत असतानाही पक्षाच्या शहर मंडळ सरचिटणीस ने राजीनामा का दिला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.या राजीनाम्याने आता पक्षांतर्गत धुसफूस चांगलीच चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासून पक्षाशी निष्ठांवंत असणाऱ्या युवराज यादव हे अभ्यासू आणि त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य असल्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग दिवा शहरात आहे. त्यामुळे पक्ष संघटनेला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. युवराज यादव यांच्या नंतर आणखी काही प्रमुख पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. एकंदरीत दिव्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याच्या धक्क्यातून अजून भाजप सावरलेला नाही असेच यावरून दिसत आहे.
“मी माझ्या वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिला आहे.पक्षावर कोणतीही नाराजी नाही.पक्षाच्या कामासाठी वेळ देता येत नसल्याने मी माझा राजीनामा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे पाठवून दिला आहे!”
– युवराज यादव,सरचिटणीस
भाजपा दिवा शहर मंडळ
“माझा युवराज यादव यांच्याशी संपर्क झालेला नाही.मी बाहेर आहे.त्यांच्या मागणीवरूनच त्यांना मंडळाचे सरचिटणीस करण्यात आले.पक्षात नाराज असल्याचे वृत्त चुकीचे आहे. त्यांच्याशी चर्चा करून वरिष्ठांसमोर त्यांना त्यांची व्यथा मांडण्याची संधी दिली जाईल!”
– सचिन भोईर, अध्यक्ष
भाजप दिवा शहर मंडळ