विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या जेवण पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांचा परवाना तात्काळ रद्द करा
दिवा:-दिवा शहरातील आगासन गाव येथील महापालिका शाळा क्रमांक 88 मधील विद्यार्थ्यांना मध्यान जेवणामध्ये पाल सापडल्याने एकच खळबळ उडाली. दिवा शहरात हा झालेला दुसरा गंभीर प्रकार असून महापालिका शाळांमध्ये पुरवठा केले जाणारे जेवण तात्काळ थांबवण्यात यावे व संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी आता केली आहे.
या गंभीर प्रकारानंतर ज्योती पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून शाळा प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. याआधीही साबे येथील महापालिका शाळेत आमलेले जेवण व निकृष्ट दर्जाचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जात असल्याचा प्रकार ज्योती पाटील यांनी पालकांच्या उपस्थितीत उघडतील आणला होता. त्यानंतर झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आली होती.मात्र त्यानंतर ही अद्यापही असे प्रकार थांबले नसून आगासन येथे शाळेत जेवणात पाल सापडल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करणाऱ्या प्रशासनावर व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी व ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्योती पाटील यांनी केली आहे. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या विधानसभा महिला संघटिका योगिता नाईक यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






