ठाणे: कळवा, मनीषा नगर गेट नंबर २ येथील दुर्गेश सोसायटी मध्ये लागलेल्या आगीत सोसायटीमधील तब्बल १० मीटर बॉक्स आणि १२ इलेक्ट्रिक स्विच बोर्ड व इलेक्ट्रिक वायरिंग जळून खाक झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास समोर आली. तसेच ती आग स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच नियंत्रणात आणली. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
कळवा, मनीषा नगर गेट नंबर २ येथे दुर्गेश ही तळ अधिक ४ मजली इमारत असून या इमारतीच्या तळ मजल्यावरील मीटर रूममध्ये आग लागल्याची माहिती नीलेश शिंदे नामक इसमाने फोनवरून ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेतली.तसेच त्या विभागांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या आगीवर नियंत्रण मिळविले. तर, या घटनेत १० मीटर बॉक्ससह १२ इलेक्ट्रिक स्विच बोर्ड व इलेक्ट्रिक वायरिंग जळाले आहे. पण, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून यावेळी ०१ रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.