ठाणे : कोकेन हे अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या नवीमुंबईतील ओन्यादीकांची वॉन्को प्राचिओस (२४) या नायजेरियनसह भायखळा येथील अझर उर्फ आलम आबीद शेख (२७) व उस्मान उर्फ सोनू अब्दुल कादीर शेख (३७) या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांनी अटक केली.तसेच त्यांच्याकडून १०१.१६ ग्रॅम वजनाचा १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
नवीन आरटीओ कार्यालयाजवळील सेवा रस्त्यावर अंमली पदार्थ विक्रीसाठी एक जण येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार ७ जानेवारी रोजी या भागात सापळा रचुन अझर याला अटक केली. त्याच्या चौकशीत आलेल्या माहितीनुसार आणखी दोघांना अटक करून एकूण मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वागळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या त्रिकुटाने जप्त केलेला कोकेन हा अंमली पदार्थ त्यांनी कोठुन आणला ? तसेच या व्यतिरीक्त आणखी साठा आहे का? याबाबत अधिक तपास मालमत्ता गुन्हे कक्ष करीत आहेत. ही कामगिरी अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.