ठाणे : – नृत्यकलेला संपूर्ण जीवन समर्पित करत सशक्त समाज कथक नृत्याद्वारे गेली 48 वर्षे घडविणाऱ्या ठाणे भूषण गुरुवर्या डॉ. मंजिरी श्रीराम देव यांचा पंचाहत्तरी सोहळा 16 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी 9.30 वाजता अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर विशेष अतिथी म्हणून खासदार नरेश म्हस्के, पर्यटनमंत्री प्रताप सरनाईक, संगीत नाटक अकादमीच्या चेअरमन डॉ. संध्या पुरेचा, आमदार संजय केळकर, पद्मश्री गुरु डॉ. पुरु दाधीच, पद्मभूषण डॉ. एन. राजम, पद्मभूषण बेगम परवीन सुलताना, पद्मश्री पं. सतीश व्यास, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. विभा दाधीच आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रथम गुरु पं. बद्रिनाथ कुलकर्णी, त्यांच्या गुरु सुश्री. आशाताई जोगळेकर, गुरु पद्मश्री नटराज गोपीकृष्ण आणि गुरु पद्मश्री डॉ. पुरु दाधीच या चारही गुरुंची छाप आणि गुरुनिष्ठा डॉ. मंजिरी श्रीराम देव यांच्या एकल नृत्य सादरिकरणात अगदी सहज दिसते. प्रत्येक गुरुकडून मिळालेली एक- एक बंदिश, रचना त्या प्रसादरुपी मानतात आणि तशीच्या तशी त्या सादर करतात. आजवर डॉ. सौ. मंजिरी श्रीराम देव यांनी संगीत भूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव, शारदा संगीत महोत्सव, कथक कला केंद्र दिल्ली महोत्सव, कोरिअन फुल मुन उत्सव, अमेरिकेत ‘तौर्य’ उत्सव अशा अनेक मोठ्या समारंभात एकल कथक प्रदर्शन केले आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नृत्यांगना म्हणून डॉ. मंजिरी श्रीराम देव यांची ओळख असून त्यांनी महाराष्ट्र ते अन्य राज्यांच्या लोक परंपरेलाही मान दिला आहे. वासुदेव, कडकलक्ष्मी, भारूड, भांगडा, घुमर, कोळी, बिहू अशा अनेक लोकनृत्यांचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत.
गुरु डॉ. मंजिरी देव यांच्या आजवर 300 हून अधिक विशारद आणि अलंकार एम.ए. पदवी धारक शिष्यगण भारतासहित दुबई, सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये नृत्यगुरू आणि कथक कलाकार म्हणून नाव मिळवित आहेत.
पंचाहत्तरी सोहळ्यास हजारोंच्या संख्येने त्यांचा शिष्य परिवार `अमृत मंजिरी’ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे आयोजन मुकुंदराज देव यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे.