Homeठाणे-मेट्रोभारतीय नववर्षे स्वागतयात्रेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्षे ; ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी...

भारतीय नववर्षे स्वागतयात्रेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्षे ; ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचे आवाहन

ठाणे :- ठाणे महानगरपालिका व श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने रविवार 30 मार्च 2025 रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्यादिवशी स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा या अभियानात नागरिकांमध्ये ई-प्रतिज्ञा करण्याविषयी स्वागत यात्रेत जनजागृती करण्यात यावी, त्याचप्रमाणे शाडू मातीच्या गणेशमूर्ती वापराबाबतही नागरिकांमध्ये जागृती करावी असे नमूद करीत यंदाचे स्वागतयात्रेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी आज झालेल्या बैठकीत केले.
नववर्ष स्वागतयात्रेची तयारी करण्याच्या दृष्टीकोनातून आज (07 मार्च 2025) महापालिकेत अतिरिक्त्‍ आयुक्त्‍ 1 संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त उमेश बिरारी, महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, निमंत्रक तनय दांडेकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

30 मार्च 2025 रोजी सकाळी 7.00 वाजता श्रीकोपिनेश्वर मंदिरापासून स्वागतयात्रेस सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांची साफसफाई करणे, मंदिराशेजारी असलेल्या भाजीमार्केट परिसरात स्वच्छता ठेवणे, तलावपाळीचा संपूर्ण परिसर स्वच्छ राहिल या दृष्टीने कार्यवाही करणे, स्वागतयात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सुरक्षा रक्षक तसेच सफाई कामगार तसेच यात्रेदरम्यान रुग्ण्वाहिका उपलब्ध करावी. तसेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव येथे दीपोत्सव होणार असून या दृष्टीनेही सदरचा परिसर स्वच्छ करुन घेण्याबाबतच्या सूचनाही माळवी यांनी बैठकीत दिल्या.

असे असतील पालिकेचे जनजागृती करणारे चित्ररथ….

पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने स्वागत यात्रेच्या मार्गावर ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सवात पीओपी मुर्त्यांऐवजी शाडूच्या मातीचा वापर करा, यासाठी महापालिका मूर्तीकारांना माती उपलब्ध करुन देणार असून याबाबतची जनजागृतीही चित्ररथाच्या माध्यमातून करण्याच्या सूचना माळवी यांनी दिल्या. याचबरोबर महापालिकेच्या शिक्षणविभाग, आरोग्य, प्रदुषण, घनकचरा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावे असेही त्यांनी यावेळी नमूद केले

या ठिकाणी होणार यात्रेवर पुष्पवृष्टी….

श्रीकौपिनेश्वर मंदिर येथून सुरू होणारी स्वागतयात्रा चिंतामणी चौक, दगडी शाळा, गजानन महाराज मठ, तीन पेट्रोलपंप मार्गे हरिनिवास सर्कल, गोखले रोड, राममारुती रोड मार्गे जाणार आहे. जांभळीनाका, हरिनिवास सर्कल व समर्थ भांडार गोखले रोड या ठिकाणी यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून याबाबतची संपूर्ण तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला माळवी यांनी दिल्या.

अशी आहेत विद्यार्थीनींसाठी विशेष कार्यक्रम…

स्वागतयात्रेचे यंदाचे 25 वे वर्षे असून शहरात जनजागृती होण्याच्या दृष्टीने कौपिनेश्वर न्यासाच्यावतीने शहरातील महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले असून महिला दिनाचे औचित्य साधून 9 मार्च रोजी इटर्निटी मॉल येथे महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ठाणे शहरातील महिला पत्रकारांचा तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येणार 22 मार्च रोजी कौपिनेश्वर मंदिर प्रांगण येथे सायंकाळी महिला पौराहित्य वर्गाचे रुद्र पठण व नृत्यधारा हे कार्यक्रम होणार आहे. 23 मार्च रोजी सकाळी 10 ते 1 संत संमेलन व सायंकाळी मृदुला दाढे- जोशी प्रस्तुत संगीत रजनी कार्यक्रम आयोजित केला आहे. 26 मार्च रोजी सायं. 8 ते 11 या वेळेत अभिराम भडकम प्रस्तुत गोष्ट संयुक्त मानापमानाची हा खास प्रयोग डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित केला आहे.

इथे होणार गंगा आरती...

28 मार्च 2025 रोजी सायं. 7.00 ते 8.30 या वेळेत हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा आरती उपवन घाट येथे होणार असून यासाठी वाराणसी येथील पंडित उपस्थित राहणार आहेत. तर 29 मार्च रोजी सायं. 7 ते 7.30 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत मासुंदा तलावाभोवती दिपोत्सव साजरा होणार असून त्यानंतर मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट येथे गंगाआरती होणार आहे.

गावदेवी मैदानात महारांगोळी….

28 ते 30 मार्च 2025 दरम्यान गावदेवी मैदान येथे संस्कारी प्रस्तुत भव्य महारांगोळी काढण्यात येणार आहे. तसेच फोटो सर्कल आयोजित मागील स्वागतयात्रांचे छायाचित्रांचे प्रदर्शन व चित्रकार विजयराज बोधनकर यांचे अर्कचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कार्याध्यक्ष संजीव ब्रम्हे यांनी यावेळी दिली.

error: Content is protected !!