ठाणे :- ठाणे महानगरपालिका क्षेत्रांतील घनकचरा तसेच वाहतूक कोंडीचा विषय ग्रहण झाल्यामुळे, ठामपा क्षेत्रांतील नागरी सुविधांची (इन्फ्रास्ट्रक्चर) कामे वगळून इतर सर्व बांधकामांना स्थगिती द्यावी तसेच सदर विषयावर विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी ठाणे शहर (जि.) काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सोमवारीपत्रकार परिषदेत केले.
या संदर्भातील निवेदने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव तसेच विरोधी पक्षनेते भास्करराव जाधव आदींना दिली आहेत.
सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापनेची गंभीर समस्या उद्भवली आहे. अलिकडेच टिकुजिनीवाडी परिसरातील मुल्लाबाग येथे महापालिका प्रशासन व तेथील नागरिक यांच्यामध्ये वाद उद्भवला होता. ठाणे शहर परिससरात ठिकठिकाणी कचऱयावरून स्थानिक नागरिक व प्रशासन यामध्ये संघर्ष होताना दिसत आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 मधील तरतुदीनुसार शहरातील अनधिकृत व अधिकृत व्यवसायिक व्यवस्थापन व आस्थापना जे दिवसाला शंभर किलो पेक्षा जास्त घनकचरा निर्मिती करतात त्या व्यवस्थापनाने स्वतच्या कचऱयाचे वर्गीकरण करून ओल्या कचऱयाची विल्हेवाट स्वत लावावी असे या नियमांमध्ये घालून दिलेल्या तरतुदी म्हणतात. ठाणे शहरामध्ये दररोज सद्यस्थितीत 1300 ते 1400 मेट्रिक टन घनकचऱ्याची निर्मिती होते व त्यातील सुमारे 40 ते 45 टक्के कचरा हा अधिकृत/अनधिकृत व्यवसायिक व्यवस्थापनातून निर्माण होतो, अशी माहिती अॅड. विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी त्यांच्या सोबत ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे,हिंदुराव गळवे,भालचंद्र महाडिक,महेंद्र म्हात्रे,शिरीष घरत उपस्थित होते.
सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेत डम्पिंग आणि हस्तांतरण स्थानक (ट्रान्सपोर्टेशन) याचा मोठा अभाव आहे. वास्तविक शहर वाढत होते तेव्हा याचा विचार झाला पाहिजे होता तेव्हा मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होत्या आता लोक वस्ती दाट झाली आहे त्यामुळे हा प्रश्न उद्भवला आहे यामुळे प्रशासन व नागरिक हतबल झालेले आहेत. नागरिकांचा असा समज झाला आहे की त्यांच्यावर सर्व गोष्टी लादल्या जातात, म्हणून ते या बाबींचा विरोध करीत आहेत व शहरात ठीकठिकाणी त्यांच्या भावनांचा उद्रेक होताना दिसत आहे. नागरी सुविधांचा बोजा पडल्यामुळे, उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवली मधील नवीन बांधकामांना स्थगिती दिली होती तशाच प्रकारचा प्रश्न सध्या ठाणे शहरात उद्भवला आहे. एकीकडे घनकचऱयाची गंभीर समस्या व दुसरीकडे शहरातील वाढत्या बांधकामामुळे प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या, वाहनांच्या संख्येत वेगाने होणारी वाढ तसेच मेट्रो, क्लस्टर रेल्टर व ठिकठिकाणी रस्त्यांवर होत असलेले खोदकाम यामुळे कचऱयाबरोबरच वाहतूक कोंडीचा प्रश्न ग्रहण झालेला आहे. त्यातच संपूर्ण शहरभर अनधिकृत बांधकामे व फेरीवाल्याचा शहराला पडलेला विळखा यामुळे निर्माण होणारा घनकचरा, पाण्याची समस्या याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे व त्यामुळे ठाणे शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तरी याबाबत तोडगा निघेपर्यंत ठाणे महानगरपालिकेने नागरिक सुविधांची योजना (इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट) सोडून नव्याने निर्माण होत असलेल्या अधिकृत बांधकामांना तातडीने स्थगिती द्यावी व अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याकरता वेगवान टास्क फोर्स ची निर्मिती करावी अशी मागणी अॅड. विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच महापालिकेच्या मंजूर आकृतिबंध आस्थापनाच्या घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनेसाठी रिक्त असलेल्या जागेवर तज्ञ व्यक्तीची तातडीने नियुक्ती करणे गरजेचे आहे. तसेच या सर्व बाबींवर चर्चा करण्याकरता व नागरिकांचा लोकशाहीवर विश्वास अबाधित ठेवण्याकरता आयुक्तांनी ठामपाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती ठाणे शहर (जि.) काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.






