ठाणे रेल्वे स्थानकातील गैरसोयींकडे संजय वाघुलेंनी वेधले लक्ष
ठाणे:- मुंबई-ठाणे रेल्वेसेवेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी. रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा पडलेला विळखा, पादचारी पूलावर फेरीवाल्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रवाशांना धमक्या आणि स्वच्छतागृहात लघुशंकेसाठीही शूल्क आकारून प्रवाशांची होणारी फसवणूक आदी दूर करण्यासाठी प्रयत्न करावी, अशी आग्रही मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली.
ठाणे रेल्वे स्टेशनमधून दररोज सुमारे साडेसहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. वाढत्या प्रवाशी संख्येबरोबरच रेल्वे स्टेशनमधील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. आज १६ एप्रिल रोजी मुंबई-ठाणे रेल्वेसेवेचा १७२ वा वर्धापनदिन साजरा करीत असतानाच, ठाणेकर प्रवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत, याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी रेल्वे स्टेशन व्यवस्थापक किशोत तावडे यांचे लक्ष वेधले. या वेळी भाजपाचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांगरेकर, हिरोज कपोते, हनुमंता शिंगे, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले यांचीही उपस्थिती होती.
ठाणे रेल्वे स्टेशनच्या १५० मीटरपर्यंत परिसरात फेरीवाल्यांना बंदी असली तरी, रेल्वे प्रशासनातील काही अधिकारी व काही आरपीएफ जवानांच्या संगनमताने बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव होत आहे. रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलांचाही ताबा फेरीवाल्यांनी घेतला असून, गर्दीच्या वेळी अडथळ्याबाबत तक्रार करणाऱ्या प्रवाशांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्मवरील स्वच्छतागृहाच्या कंत्राटाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही, कंत्राटदाराने ताबा सोडलेला नाही. रेल्वेच्या नियमानुसार लघुशंकेसाठी मोफत सुविधा असतानाही, प्रवाशांकडून पैसे उकळले जात आहेत. प्लॅटफॉर्म क्र. १ बाहेरील वाहनतळाच्या ठेकेदाराकडून पार्किंग इमारतीतील रॅम्पवरही दुचाकी लावल्या जात असून, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुर्देवाने एखादी दुर्घटना घडल्यास रॅम्पवरील वाहनांचा अडथळा येण्याची भीती वाटते. या समस्यांचा विळखा सोडविण्याची गरज आहे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केली.






