Homeठाणे-मेट्रोबंद पडलेल्या ट्रकने घोडबंदर रोडचे वाजवले तीन तेरा ; दहा तासांनी बंद...

बंद पडलेल्या ट्रकने घोडबंदर रोडचे वाजवले तीन तेरा ; दहा तासांनी बंद पडलेला ट्रक हलवण्यात यश

बारा तासांनी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात

ठाणे:- घोडबंदर रोडवर एकीकडे मेट्रोचे जोरदार कामे सुरू असताना, अचानक गायमुख घाटात गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते पावणे एक वाजण्याच्या सुमारास राख घेऊन जाणारा ट्रक बंद पडला. तो ट्रक दोन क्रेनच्या साहाय्याने हालत नसल्याने घोडबंदर रोडवरील वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. ठाण्याकडून घोडबंदर रोडला जाणाऱ्या वाहिनीवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गायमुख घाट येथून या वाहनांच्या रांगा थेट कापूरबावडी नाक्यापर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तसेच बंद पडलेला ट्रक गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हलविण्यात आल्यानंतर जवळपास बारा तासांनी वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली. या गोंधळात मात्र सकाळी कामाला निघालेल्या नोकरदार वर्गाचे चांगले हाल झाले.
नाशिकचे सचिन नीलकंठ यांचा मालकीचा ट्रक हा ५० टन राख घेऊन चालक निघालेला होता. तो गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते पावणे एक वाजण्याच्या सुमारास गायमुख घाटामधील नीरा केंद्रच्या चढणीवर अचानक बंद पडला. त्या ट्रकची पाहणी करताच त्या ट्रकचा पाटे, जॉईंटही तुटले होते. शिवाय प्रेशर पाईप ही फाटला होता. तसेच बूस्टर तुटल्याने तो ट्रक 2 क्रेन लावून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण, तो काही हालतच नव्हता. त्यातच घोडबंदर रोडवर मेट्रोचे काम सुरू आहे. या शिवाय रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची वाहतुकी सुरू असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली. दरम्यान घोडबंदर ठाणे वाहिनीवर मेट्रोचे काम चालू असल्यामुळे येणाऱ्या वाहिनीचा बॅकलॉग देखील फाउंटन हॉटेलपर्यंत गेलेला असल्याने दुसऱ्या वाहिनीवरील कामे धाव घेतलेल्या वाहतुक पोलिसांनी तात्काळ बंद करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र सकाळी नोकरदार वर्गाची कामाला जाण्यासाठी लगबग सुरू झाल्याने वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत त्याची भर पडली. यामुळे सकाळ सकाळीच घोडबंदर रोडवरील वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. यामुळे गायमुख येथून कापूरबावडी नाक्यापर्यंत वाहनांच्या उड्डाणपूल असो या खाली रस्त्यावर रांगा लागल्या होत्या. अखेर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तो ट्रक बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर कुठे दुपारी बारा वाजेपर्यंत वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.

” नादुरुस्त ट्रक 2 क्रेन लावून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ट्रक हालत नव्हता. अखेर गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तो ट्रक हलविण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. याचदरम्यान घोडबंदर ठाणे वाहिनीवर मेट्रोचे काम चालू असल्यामुळे येणाऱ्या वाहिनीचा बॅकलॉग वाढल्याने दुसऱ्या वाहिनीवरील काम तात्काळ बंद करून वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. “- पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर

error: Content is protected !!