ठाणे :- घोडबंदर भागातील गायमुख घाट रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर आता माजिवडा ब्रीज घोडबंदर – मुंबईवाहीनीवरील यु टर्न पासून ते ज्युपीटर वाय जंक्शन पर्यंत उड्डाणपुलावर मास्टीक टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम आज म्हणजे ३ मे ते २२ मे २०२५ पर्यंत असे २१ दिवस रात्री करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री ११ ते पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
मागील काही दिवसापासून घोडबंदर भागातील गायमुख घाटाचे काम हाती घेण्यात आले होते. ते १ मे रोजी पूर्ण होऊन येथील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु यामुळे दोन दिवस या भागात वाहतुक कोंडी झाली होती. त्यात आता पावसाळ्यापूर्वी माजिवडा येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्यात येथील पुलावर खड्डे पडून वाहतुकीला अडथळा होऊ नये या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी येथील उड्डाणपुलावरील पृष्ठभागावरील मास्टीक हे मिलिंग मशीनद्वारे टप्याटप्याने खरडून काढण्यात येणार आहे. मास्टीक काढल्यानंतर मनुष्यबळाच्या सहाय्याने त्यावर टप्याटप्याने रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मास्टीक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन जाणारी वाहतुक ही पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहे. येथील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. परंतु या कामामुळे कापुरबावडी सर्कल आणि माजिवडा उड्डाणपुलाखाली वाहतुक कोंडी वाढणार आहे. याठिकाणी सध्या मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतुकीचा वेग आधीच मंदावला आहे. त्यात आता उड्डाणपुलावरील वाहतुक देखील खालून जाणार असल्याने वाहतुकीचा भार आणखी वाढणार असून त्यामुळे कोंडीत भर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रवेश बंद – घोडबंदर – मुंबई वाहीनी तत्वज्ञान ब्रिज चढणी येथून पुलावरुन मुंबई अथवा नाशिकला जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना तत्वज्ञान ब्रीज चढणी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सर्व प्रकारची वाहने ही स्लीप रोडने कापुरबावडी सर्कल मार्गे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद – भिवंडी – नाशिक वाहीनी बाळकुम फायर ब्रिगेड ब्रीज चढणी येथून पुलावरुन मुंबई अथवा नाशिकला जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना ब्रिज चढणी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. येथून जाणाºया सर्व प्रकारची वाहने ही स्लीप रोडने कापुबावडी सर्कल मार्गे इच्छीत स्थळी जाऊ शकणार आहेत.