दिवा :- मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी एक अत्यंत दुःखद घटना घडली.ट्रेनमधून पडून पाच प्रवासी खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रेन मधून पडलेल्या सर्व प्रवाशांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.
या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साडे नऊच्या दरम्यान ही घटना घडली. धावत्या ट्रेनमधून सहा प्रवासी अचानक खाली पडले. त्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याने, पाच प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रवासी कोणत्या परिस्थितीत ट्रेनमधून खाली पडले, गर्दीमुळे तोल जाऊन पडले की अन्य कोणते कारण होते, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही.
ही घटना रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचं मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.