“अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएस ची घेऊन साथ”
ठाणे :- ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 16 जून ते 31 जुलै 2025 या कालावधीत ‘अतिसार थांबवा’ (STOP Diarrhea Campaign) ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षांखालील अतिसार बाधित मुलांना ORS पाकिट तसेच Zinc ची गोळी यांचे वाटप आशा कार्यकर्तामार्फत केले जाणार आहे. तसेच अंगणवाडी, आरोग्य केंद्रामधुन ORS घोळ तयार करण्याचे व हात धुण्याची प्रात्याक्षिके केली जाणार आहेत. तसेच संस्था स्तरांवर ORS कॉर्नरची स्थापना करणे, जलशुष्कतेने बधित रुग्णांचे उपचार केले जाणार असून अतिसाराबाबत कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
वैयक्तिक व परिसरातील स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसार पसरविणा-या जंतूंचा प्रसार होऊन अतिसाराची लागण होते. उघड्यावर शौचास बसणे, उघडयावरील अन्न पदार्थ खाणे, दैनंदिन जीवनात अशुध्द पाण्याचा वापर करणे, जेवणाआधी व शौचानंतर स्वच्छ पाणी व साबणाने हात न धुणे आदी सवयी अतिसाराचा प्रादुर्भाव होण्याकरिता कारणीभुत आहेत. अतिसाराच्या उपचाराकरीता ORS चे घोळ तयार करुन बालकाला दिल्यास शरीरातील जलशुष्कतेचे प्रमाण कमी होते, तसेच क्षारांची कमतरताही भरुन निघते, झिंकची गोळी १५ दिवस दिल्यास जुलाबाची वारंवारता कमी होवून अतिसार लवकर बरा होतो, बाळाला अतिसार किवा जुलाब चालु असताना माता स्तनपान करीत असल्यास स्तनपान सुरु ठेवावे, वाळाला हलके अन्न दयावे, स्वच्छता राखावी, मुलांचे व स्वतःचे हात वारंवार साबणाने धुवावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
अतिसार टाळण्याकरिता वैयक्तिक व परिसर स्वच्छता अत्यंत महत्वाची असून त्या करिता उघडयावर शौचाला बसणे टाळावे, पाणी उकळून व गाळून किंवा क्लोरीनचा वापर करुन निर्जंतुक करावे व आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच अतिसाराबाबत लक्षणे आढळल्यास जवळच्या ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन देखील ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.