दिवा:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, दिव्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. एकनाथ भगत (बाबा) यांचे सुपुत्र अजित भगत यांची ‘आरपीआय’च्या ठाणे जिल्हा ओबीसी सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल दिवा येथे त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
दिवा येथील स्थानिक मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अजित भगत यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कै. एकनाथ भगत यांचा सामाजिक वारसा पुढे नेणाऱ्या अजित भगत यांच्याकडे जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुढील सामाजिक तसेच संघटनात्मक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






