विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दिव्यात पदवी महाविद्यालयाची गरज
सुहास खंडागळे
दिवा: ठाणे महानगरपालिकेतील अत्यंत वेगाने वाढणारे उपनगर म्हणून ‘दिवा’ शहराची ओळख निर्माण झाली आहे. आज या शहराची लोकसंख्या साधारण पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, या प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत येथील शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत संथ गतीने होत असल्याचे चित्र आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या दिवा येथील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आजही शेजारच्या शहरांवर अवलंबून राहावे लागत आहे, कारण संपूर्ण दिवा शहरात अद्याप एकही पदवी महाविद्यालय अस्तित्वात नाही.
आधीच दिवा शहरातील अनेक विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी सुद्धा डोंबिवली सारख्या शहरात जावे लागते.
वाढत्या लोकसंख्येमुळे दिवा शहरात विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, कला, विज्ञान किंवा वाणिज्य यांसारख्या मूलभूत शाखांमध्ये पदवी शिक्षण घेण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना दररोज मुंब्रा, ठाणे, डोंबिवली, कल्याण किंवा थेट मुंबई गाठावी लागते. या प्रवासाचा मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि आरोग्यावर होत आहे. दिव्यातील विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनमधील जीवघेण्या गर्दीतून तासन् तास प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा प्रवासातच खर्च होते. विशेषतः प्रवासाचा प्रश्न पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
दुसरीकडे, मूलभूत पदवी शिक्षणाची ही अवस्था असताना कायदा , वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन यांसारख्या व्यावसायिक पदवी शिक्षणाची सोय होणे तर सध्या तरी दिवावासीयांसाठी दूरची गोष्ट वाटत आहे. खाजगी शैक्षणिक संस्थांनी या भागात गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही, तसेच शासकीय किंवा महानगरपालिका स्तरावरही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. एखाद्या शहराची लोकसंख्या जवळपास पाच लाखांवर जाते, तेव्हा तिथे किमान एक तरी शासकीय किंवा अनुदानित महाविद्यालय असणे ही काळाची गरज आहे.
दिवा शहराची भौगोलिक परिस्थिती आणि येथील मध्यमवर्गीय व कामगार वर्गाची लोकसंख्या पाहता, शासनाने आणि ठाणे महानगरपालिकेने या प्रश्नावर विशेष धोरण आखण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत या परिसरात पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध होत नाही, तोपर्यंत येथील तरुणांना शैक्षणिक समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आता तरी या ‘शैक्षणिक वनवासा’कडे लक्ष देऊन दिव्यात सुसज्ज पदवी महाविद्यालय सुरू करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.






