Homeशहर परिसरकल्याण ग्रामीणच्या आरोग्यसेवेसाठी मोठे पाऊल; निळजे येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आरोग्यमंत्र्यांना...

कल्याण ग्रामीणच्या आरोग्यसेवेसाठी मोठे पाऊल; निळजे येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आरोग्यमंत्र्यांना साकडे

दिवा/कल्याण ग्रामीण:कल्याण ग्रामीण मतदारसंघातील वाढते शहरीकरण आणि नागरिकांची आरोग्यविषयक गरज लक्षात घेता, निळजे येथे १०० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात यावे, या महत्त्वपूर्ण मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना. श्री. प्रकाश आबिटकर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे प्रामुख्याने निळजे आणि परिसरातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न मांडण्यात आला आहे. निळजे येथे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास कल्याण ग्रामीणमधील २७ गावे, श्री मलंगगड परिसरातील ३६ गावे तसेच नवी मुंबईत समाविष्ट झालेली १४ गावे अशा एकूण ७७ गावांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होतील. सद्यस्थितीत निळजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली असून अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा देण्यात मर्यादा येत आहेत. गंभीर रुग्णांना उपचारासाठी डोंबिवली येथील शास्त्रीनगर किंवा कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मात्र, हे अंतर जास्त असल्याने आणि वाहतूक कोंडीमुळे वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होतो, ही गंभीर बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.

निळजे आणि आसपासच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर नवीन गृहप्रकल्प उभे राहत असून वेगाने शहरीकरण होत आहे. या भागात प्रामुख्याने अल्पउत्पन्न गटातील नागरिक वास्तव्यास असून ते पूर्णपणे सरकारी आरोग्य सेवांवर अवलंबून आहेत. १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास तातडीची उपचार सेवा, मातृत्व सेवा आणि विविध तज्ज्ञ वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होतील. कल्याण ग्रामीणमधील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळवून देणे हे माझे कर्तव्य असून, शासनाने या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता द्यावी, अशी आग्रही विनंती यावेळी करण्यात आली.

error: Content is protected !!