दिवा (प्रतिनिधी) दिवा शहरात सर्वसामान्य नागरिकांना अंत्यसंस्कारावेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेता, दातिवली येथील स्मशानभूमीत तातडीने ‘गॅस दहन वाहिनी’ कार्यान्वित करून ती मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला शहर संघटिका सौ. ज्योती पाटील यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
दातिवली येथील स्मशानभूमी हे दिवा परिसरातील अंत्यसंस्काराचे मुख्य ठिकाण आहे. सध्या या ठिकाणी केवळ लाकडाचा वापर करून पारंपारिक पद्धतीने दहन केले जाते. मात्र, वाढत्या महागाईमुळे लाकडाच्या किमती गगनाला भिडल्या असून, अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडं विकत घेताना गरीब कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. दुःखाच्या प्रसंगी सर्वसामान्यांना हा खर्च पेलणे कठीण होत असल्याचे सौ. पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. महानगरपालिकेने या ठिकाणी गॅस दहन वाहिनी सुरू केल्यास ही सेवा नागरिकांना पूर्णपणे मोफत देता येईल, ज्यामुळे जनतेला मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
या सुविधेमुळे केवळ आर्थिक बचतच होणार नाही, तर लाकडाचा वापर कमी झाल्यामुळे वृक्षतोड थांबेल आणि हवेचे प्रदूषणही कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होईल. तसेच गॅस दहन पद्धती ही पारंपारिक पद्धतीपेक्षा जलद आणि अधिक स्वच्छ असल्याने वेळेचीही मोठी बचत होईल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. दिवा शहराचा वाढता विस्तार आणि येथील कष्टकरी जनतेची संख्या पाहता, प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून दातिवली स्मशानभूमीत गॅस दहन वाहिनी बसवण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी आग्रही विनंती सौ. ज्योती पाटील यांनी केली आहे.






