Homeठाणे-मेट्रोरायलादेवी तलावाच्या दुरावस्थेबाबत तातडीने उपाययोजना करा नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता...

रायलादेवी तलावाच्या दुरावस्थेबाबत तातडीने उपाययोजना करा नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांची मागणी

ठाणे – ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधील रायलादेवी तलावाची सध्याची दुरावस्था अत्यंत चिंताजनक बनली असून, नागरिकांच्या सुरक्षेसह पर्यावरणीय संतुलनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून नुकताच तलाव सुशोभीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला असला, तरी त्या कामाची योग्य देखभाल आणि संरक्षण होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. रायलादेवी तलावाच्या दुरावस्थेबाबत तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.
रायलादेवी तलाव परिसरात सुरक्षारक्षक व देखभाल कर्मचारी नसल्यामुळे येथे दारूडे व नशेखोरांचा अड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, परिसरात स्वच्छतेचा अभाव, वाढता कचरा, आणि कबूतरांना दिल्या जाणाऱ्या खाद्यामुळे निर्माण होणारी घाण व दुर्गंधी यामुळे तलावाचे सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्त्व धोक्यात आल्याचे विकास रेपाळे आणि नम्रता भोसले-जाधव यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

या पार्श्वभूमीवर, ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. तलाव परिसरात तात्काळ सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, कायमस्वरूपी देखभाल कर्मचारी नेमावेत, नियमित पोलीस गस्त वाढवावी, मद्यपान व इतर गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी, परिसराची नियमित स्वच्छता सुनिश्चित करावी, सुशोभीकरणाच्या कामाच्या संरक्षणासाठी विशेष यंत्रणा उभारावी, कबूतरांना खाद्य देण्यावर निर्बंध घालून तातडीने कारवाई करावी.

नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी प्रशासनाला या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!