दिवा (प्रतिनिधी): ठाणे महानगरपालिकेचा भाग असलेल्या दिवा शहरात विकासाच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी, मूलभूत सुविधांच्या बाबतीत दिवा आजही उपेक्षितच आहे. दिवा पश्चिम येथील गावठाणातील स्मशानभूमी सध्या ‘अखेरच्या घटका’ मोजत असून पालिकेच्या दुर्लक्षामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. विशेषतः छताअभावी पावसाळ्यात अंत्यविधी कसा करायचा, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
शासकीय दप्तरी नोंद असूनही या स्मशानभूमीकडे प्रशासनाने वर्षानुवर्षे पाठ फिरवली आहे. पालिकेकडून कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने अखेर दिवा ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. लोकवर्गणी जमा करून स्मशानभूमीत मातीची भरणी करणे, लोखंडी बर्नर बसवणे आणि सिमेंटचा चौथरा उभारण्याचे काम ग्रामस्थांनी स्वखर्चातून केले आहे. जे काम पालिकेने करणे अपेक्षित होते, ते काम लोकसहभागातून करावे लागल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्मशानभूमीच्या चौथऱ्यावर अद्याप छत नाही. त्यामुळे रणरणत्या उन्हात आणि आता आगामी पावसाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार करणे कठीण होऊन बसले आहे. पावसाळ्यात चिता पेटवताना आणि पावसामुळे ती विझू नये म्हणून नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीवर तात्काळ पक्के छत उभारावे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था आणि पुरेसा प्रकाश उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्मशानभूमीची अवस्था अतिशय बिकट असून पालिकेला वारंवार सांगूनही दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. ठाणे महानगरपालिका आता तरी या संवेदनशील प्रश्नाकडे लक्ष देऊन दिव्यातील नागरिकांची ही मोठी गैरसोय दूर करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






