Homeशहर परिसरगोविंद भगत यांचे निधन, दिवा व ग्रामीण जनतेसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणारे नेतृत्व...

गोविंद भगत यांचे निधन, दिवा व ग्रामीण जनतेसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणारे नेतृत्व हरपले

• सुहास खंडागळे

दिवा:आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष आणि दिवा – कल्याण ग्रामीण भागातील आगरी समाजाच्या प्रश्नांवर आक्रमक पणे आवाज उठविणारे गोविंद भगत यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी लढणारे नेतृत्व हरपले आहे.

गोविंद भगत यांनी रेल्वे सेवेत असतानाच तेथील कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यास सुरूवात केली. अन्यायाविरोधात संघर्ष ही त्यांची ओळख पुढे अधिक प्रखर झाली. सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवला.ग्रामीण भागातील आगरी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्थापन झालेल्या आगरी युवक संघटनेच्या माध्यमातून गोविंद भगत यांनी दिवा कल्याण ग्रामीण भागातील अनेक समस्यांवर आवाज उठवला. प्रशासनाला धारेवर धरले. दिव्यावर होणारा अन्याय लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात त्यांनी सातत्याने लढा दिला. लोकांच्या बाजूने उभे राहून महापालिकेच्या चुकीच्या धोरणांना त्यांनी विरोध केला.शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलने केली. ग्रामीण जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम गोविंद भगत यांनी केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी झालेल्या आंदोलनात गोविंद भगत नेहमीच पुढे राहिले.दिवा आणि परिसराच्या सामाजिक वाटचालीत त्यांचे योगदान राहिले आहे. समाजावर अन्याय होता कामा नये ही त्यांची भूमिका कायम राहिली आहे. अलीकडेच टोरंट पॉवर विरोधात सातत्याने अभ्यास पूर्ण लढा उभारण्याचे काम त्यांनी केले. शेवट पर्यंत त्यांचा हा संघर्ष सुरूच राहिला. आपला गाव, आपली सर्वसामान्य माणसं आणि एकंदरीत समाज यासाठी लढणारे नेतृत्व आज हरपले आहे.

error: Content is protected !!