Homeठाणे-मेट्रो"खाड्या बुजवून विकास नव्हे, पर्यावरणाचा खून; काँग्रेसचा घणाघात"

“खाड्या बुजवून विकास नव्हे, पर्यावरणाचा खून; काँग्रेसचा घणाघात”

कोस्टल रोडच्या नावाखाली खाडी, कांदळवने गिळंकृत; काँग्रेसचा संताप, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

ठाणे :ठाण्यातील पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या खाडीकिनारे, कांदळवने आणि पाणथळ जागांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर भरावांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. साकेत ते आनंदनगर कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाची खुलेआम हत्या सुरू असून प्रशासन मात्र मूक प्रेक्षक बनल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे.

खाडी परिसरातील कांदळवने ही नैसर्गिक कवचकुंडले मानली जातात. पूर नियंत्रण, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र या नैसर्गिक संपत्तीवर दिवसाढवळ्या राडारोडा, कचरा आणि गाळ टाकून भराव करण्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी आणि पुरावे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राहुल पिंगळे यांनी म्हटले आहे की, साकेत, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी, वाघबीळ, कासारवडवली आणि आनंदनगर परिसरातील पाणथळ जागा नष्ट झाल्यास त्याचा थेट परिणाम पूरस्थितीवर होणार आहे. नैसर्गिक जलसाठे आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा बुजवल्यामुळे भविष्यात हजारो नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो.

काँग्रेसने या प्रकरणात संबंधित भरणी माफिया, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच नष्ट करण्यात आलेल्या कांदळवनांचे आणि पाणथळ क्षेत्रांचे तातडीने पुनरुज्जीवन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पर्यावरणाच्या विनाशावर विकासाचा मुलामा देण्याचा प्रयत्न ठाणेकर सहन करणार नाहीत. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजेही ठोठावेल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणाच जर गप्प बसणार असतील, तर भविष्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीची आणि पर्यावरणीय हानीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

error: Content is protected !!