प्रवाशांना दिलासा द्या – नगरसेवक आदेश भगत
दिवा: पावसाळा सुरू होताच दिवा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. स्थानकावरील गळकी छते, तुटलेले पत्रे, अपुरी प्रकाश व्यवस्था आणि साचणारे पाणी यांमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. आदेश कमलाकर भगत यांनी दिवा रेल्वे स्थानक प्रबंधकांना नुकतेच एक निवेदन दिले असून, या समस्यांवर तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
दिवा रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे स्थानक परिसरात प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
निवेदनात प्रामुख्याने पुढील गंभीर मुद्द्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे:
फलाटांवर छत्र्या उघडण्याची वेळ: स्थानकावरील अनेक फलाटांची छते गळत असल्यामुळे पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर आणि बसण्याच्या बाकांवर पडत आहे. त्यामुळे लोकलची प्रतीक्षा करताना प्रवाशांना फलाटावरच छत्री उघडून उभे राहावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे.
तुटलेले पत्रे आणि अपघाताची भीती: मुंबई दिशेकडील जिन्यावरील पत्रे तुटलेली आहेत, तर काही पत्रे दुरुस्तीच्या नावाखाली काढून ठेवण्यात आली आहेत. ती अद्याप न बसविल्यामुळे जिना चढताना-उतरताना प्रवाशांची तारांबळ उडत आहे. तसेच जिन्याखाली पाणी साचत असल्याने प्रवासी घसरून पडण्याचे अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अंधाराचे साम्राज्य आणि पाण्याचा वेढा: कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचा पूर्वेकडे उतरणारा भाग अंधारात बुडाला असून, तेथील अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना चाचपडत प्रवास करावा लागतो. त्यातच हा जिना उतरल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
“दिवा स्थानकावरील या समस्या थेट प्रवाशांच्या सुरक्षेशी जोडलेल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने संबंधित विभागाला तात्काळ निर्देश देऊन गळकी छते दुरुस्त करावीत, तुटलेले पत्रे बसवावेत आणि प्रकाश व्यवस्थेत सुधारणा करावी.”
— अँड. आदेश कमलाकर भगत (नगरसेवक व अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना)
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी स्थानकावरील दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.






