Homeठाणे-मेट्रोठाणे मनपा आणि रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम; क्षयरुग्णांना पौष्टिक फूड बास्केटचे वितरण

ठाणे मनपा आणि रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम; क्षयरुग्णांना पौष्टिक फूड बास्केटचे वितरण

ठाणे:डॉक्टर दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात क्षयरोग (टीबी) रुग्णांसाठी पौष्टिक आहारयुक्त फूड बास्केट वितरण कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांना आवश्यक पोषणमूल्ये मिळावीत, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी आणि उपचार अधिक प्रभावी ठरावेत, या उद्देशाने या फूड बास्केटचे वितरण करण्यात आले. रोटरी क्लबने अनेक वर्षांपासून क्षयरुग्णांना उपचारांसोबत पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला असून, हा उपक्रम पुढे अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला महापौर सौ. शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते श्री. हणमंतजी जगदाळे, शिवसेना गटनेते श्री. पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक श्री. राम रेपाळे, नगरसेवक श्री. योगेश जानकर, ठाणे मनपाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे, रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर चंद्रहास शेट्टी, डॉ. सोनल बनगाडे आणि रोटरी क्लबचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉक्टर दिनानिमित्त मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी मनपाच्या २४x७ अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा, एका फोनवर १५ ते २० मिनिटांत रुग्णवाहिका मिळण्याची सुविधा आणि सी.आर. वाडिया परिसरातील प्रयोगशाळेत मोफत वैद्यकीय तपासण्या व त्याचे अहवाल मोबाईलवर देण्याच्या लोकाभिमुख सुविधांची माहिती दिली.

error: Content is protected !!