केदार दिघे यांचा लोकहिताचा उपक्रम
ठाणे : समाजातील प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार नेत्रसेवा पोहोचवून नेत्रविकारांचे वेळेवर निदान करणे आणि टाळता येण्याजोग्या अंधत्वाला प्रतिबंध करणे, या उद्देशाने ‘मिशन नेत्रदूत – दृष्टी वाचवूया, आनंद पसरवूया’ ही व्यापक लोकचळवळ सुरू करण्यात आली आहे. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आणि श्री रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात एक लाख नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या अभियानांतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळू न शकणाऱ्या पात्र व गरजू रुग्णांपैकी ५०० जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. नियमित नेत्रतपासणी, प्रतिबंधात्मक नेत्रआरोग्य आणि आजारांचे लवकर निदान यावर विशेष भर दिला जाणार आहे. उपलब्ध सरकारी माहितीनुसार भारतातील सुमारे ८० ते ९० टक्के अंधत्व टाळता येण्याजोगे असल्याने नागरिकांनी डोळ्यांचा त्रास होण्याची वाट न पाहता नियमित नेत्रतपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे अभियानातून सांगण्यात येत आहे.
‘मिशन नेत्रदूत’च्या माध्यमातून विविध भागांत मोफत नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली जाणार असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांच्या नेत्रआरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतीबिंदू, काचबिंदू आणि डोळ्यांच्या पडद्याशी संबंधित आजारांचे लवकर निदान करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुलांमध्ये दृष्टीदोष, अंधुक दिसणे, तिरळेपणा आणि डोळ्यांवरील ताण यांसारख्या समस्या वेळीच ओळखण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.
मधुमेही रुग्णांसाठी डायबेटिक रेटिनोपॅथीबाबत विशेष जनजागृती केली जाणार आहे. मधुमेहाचा डोळ्यांच्या पडद्यावर होणारा परिणाम सुरुवातीला सहज लक्षात येत नसल्याने गंभीर दृष्टीहानी टाळण्यासाठी नियमित नेत्रतपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.
ही मोहीम केवळ नेत्रतपासणी शिबिरांपुरती मर्यादित न ठेवता सातत्यपूर्ण नेत्रआरोग्य जनजागृती आणि शिक्षणाची चळवळ म्हणून विकसित केली जाणार आहे. नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांना नेत्रआरोग्य, प्रतिबंधात्मक काळजी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘मिशन नेत्रदूत’ ही केवळ नेत्रतपासणी मोहीम नसून दृष्टीरक्षणाची लोकचळवळ आहे. एक लाख नागरिकांची मोफत नेत्रतपासणी आणि ५०० पात्र व गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून नेत्रसेवा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प असल्याचे धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे यांनी सांगितले.
श्री रामकृष्ण नेत्रालयाचे संचालक डॉ. नितीन देशपांडे यांनी नियमित नेत्रतपासणी आणि लवकर निदानाचे महत्त्व अधोरेखित करत प्रतिबंधात्मक नेत्रआरोग्य ही प्रत्येक कुटुंबाची सवय बनविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.






