Homeठाणे-मेट्रोशिवसेना ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या विस्ताराची जबाबदारी दुबे यांच्या टीमवर

ठाणे: शिवसेना ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी शुक्रवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दुबे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला उत्तर प्रदेशातील संघटनात्मक विस्तारासाठी बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख तथा युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आनंद दुबे यांच्यासोबत गुलाबचंद मौर्य, सुनील चौबे, ब्रीजेश मौर्य, दशरथ प्रजापती, प्रवीण दुबे आणि धनंजय गुप्ता यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दुबे यांना शिवसेनेची कार्यपद्धती परिचित असून, राष्ट्रीय स्तरावर पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अनुभव आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी आनंद दुबे आणि त्यांची टीम काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना विविध कल्याणकारी योजना राबविण्यासह पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने पुढे नेण्याचे काम केल्याचे शिंदे यांनी सांगितले. विकासकामांमुळे विविध पक्षांतील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, येथे सर्वजण कार्यकर्ता म्हणून काम करतात, असे ते म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना शिंदे यांनी महायुतीचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. पुणे शिक्षक मतदारसंघात सचिन सानप यांना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असून, तेथे महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित चार ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर संविधानिक संस्थांबाबतच्या भूमिकेवरून टीका केली. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थांवर विरोधकांकडून प्रहार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. फेक नरेटिव्हच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत, देशातील जनता अशा प्रचाराला बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न जनता यशस्वी होऊ देणार नाही, असेही शिंदे म्हणाले.

error: Content is protected !!