Homeशहर परिसरदिवा शहरातील दुकानदारांना कचरापेटी ठेवणे बंधनकारक; प्रशासनाने दुकानदारांना वाटली पत्रके, नगरसेवक आदेश...

दिवा शहरातील दुकानदारांना कचरापेटी ठेवणे बंधनकारक; प्रशासनाने दुकानदारांना वाटली पत्रके, नगरसेवक आदेश भगत यांची माहिती

दिवा: दिवा शहरातील कचरा आणि स्वच्छतेचा प्रश्न गेल्या काही दिवसांत अत्यंत गंभीर बनला होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने एक महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. दिवा शहरातील सर्व दुकानदार, हॉटेल्स आणि स्नॅक्स कॉर्नर धारकांना आपल्या दुकानाबाहेर कचरापेटी ठेवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील पत्रके महापालिकेने दुकानदारांना वाटण्यास सुरुवात केली आहे. तशी माहिती नगरसेवक आदेश भगत यांनी दिली आहे.

शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांकडे या संदर्भात आपण सातत्याने मागणी करत असल्याचे आदेश भगत यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे. दुकानांमधील कचरा रस्त्यावर आणि पर्यायाने बाजूच्या गटारांमध्ये टाकला गेल्यामुळे गटारे तुंबण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे दिवावासीयांकडून स्वागत होत आहे.
नियमानुसार, दुकानदारांनी कचरा रस्त्यावर टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांनाही ओला व सुका कचरा वर्गीकरण करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी व दुकानदारांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आदेश भगत यांनी केले आहे.

error: Content is protected !!