दिवा:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मनसेच्या दिवा शहर अध्यक्षपदी प्रशांत गावडे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना प्रत्यक्ष नियुक्ती पत्र देऊन या पदाची जबाबदारी सोपवली.
दिवा शहरात पक्षाचे जाळे विस्तारणे आणि स्थानिक स्तरावर संघटनेची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी प्रशांत गावडे यांच्या रूपाने एका सक्रिय कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर गावडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली.
पक्षाने दिलेल्या या मोठ्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना प्रशांत गावडे म्हणाले की, “सन्माननीय राजसाहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी नक्कीच सार्थ करून दाखवेन. पक्षात जास्तीत जास्त नागरिकांना जोडून घेत संघटनात्मक पातळीवर मनसेचे काम प्रभावीपणे घराघरांत पोहोचवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल.” प्रशांत गावडे हे याआधी मनसे शहर सचिव म्हणून काम पाहत होते. शहर अध्यक्ष म्हणून त्यांच्यासमोर संघटनात्मक बांधणी आणि पक्ष विस्ताराचे आव्हान असणार आहे.






