नगरसेविका अर्चना निलेश पाटील व नगरसेवक बाबाजी पाटील यांची मागणी
दिवा : दिवा शहरासह खार्डी, शिळफाटा आणि महापे परिसरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि दिवसेंदिवस गंभीर होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता दिवा ते कोपरखैरणे असा थेट मेट्रो मार्ग विकसित करण्याची मागणी नगरसेविका अर्चना निलेश पाटील आणि नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यावर झालेल्या भेटीत याबाबत निवेदन देण्यात आले.
दिवा, खार्डी, शिळफाटा, महापे एमआयडीसी मार्गे कोपरखैरणे असा मेट्रो कॉरिडॉर उभारल्यास दिवा आणि नवी मुंबईदरम्यान थेट व जलद सार्वजनिक वाहतूक सुविधा निर्माण होऊ शकते. या भागातील मोठ्या संख्येने नागरिक रोजगार आणि व्यवसायानिमित्त नवी मुंबईकडे प्रवास करतात. त्यामुळे भविष्यातील २५ ते ३० वर्षांचा विचार करून या मेट्रो मार्गाचा तांत्रिक व व्यवहार्यता अभ्यास करण्याची मागणी करण्यात आली.
या मेट्रो मार्गाची म्हातार्डी येथील प्रस्तावित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाशी जोडणी करण्याची शक्यताही तपासावी, अशी मागणी करण्यात आली. मेट्रो, उपनगरीय रेल्वे, बुलेट ट्रेन आणि रस्ते वाहतूक यांची सांगड घातल्यास दिवा परिसर महत्त्वाचे वाहतूक केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो.
दरम्यान, प्रभागातील नॅशनल शाळेपासून साबेगावला जोडणारा तसेच वैभव ढाब्यापासून जीवदानी नगरला जोडणारा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याचा मुद्दाही खासदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. यावर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
दिवा शहरात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठे उद्यान व ‘नाना नानी पार्क’ उभारण्याची मागणीही करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन खासदारांनी दिले. यावेळी विभागप्रमुख निलेश पाटील उपस्थित होते.






