दिवा:पावसाळा तोंडावर आला असतानाही दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाची सुरू असल्याचा आरोप करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती राजकांत पाटील यांनी पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ज्योती पाटील यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह दिवा शहरातील विविध भागांत जाऊन थेट नाल्यांची आणि सुरू असलेल्या सफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान शहरातील नालेसफाईचा बोजवारा उडाल्याचे विदारक चित्र समोर आले.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ज्योती पाटील यांनी प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आणि निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला. अनेक ठिकाणी अजूनही नालेसफाईला सुरुवातच झालेली नाही, तर ज्या काही ठिकाणी सफाई झाली आहे, तिथे नाल्यातून काढलेला ओला गाळ रस्त्यावरच तसाच टाकून देण्यात आला आहे. हा गाळ वेळीच उचलला न गेल्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना ये-जा करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. पालिका प्रशासन केवळ दिखाव्यापुरती नालेसफाई करून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकत असल्याचा आरोप त्यांनी केला. नाल्यातून काढलेला गाळ तात्काळ गाड्यांमध्ये भरून अन्यत्र हलवण्यात यावा, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच दिवा शहरातील या ढिसाळ नालेसफाईच्या कामाची पालिका आयुक्तांनी स्वतः दखल घेऊन तात्काळ संपूर्ण कामाचा आढावा घ्यावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी शेवटी केली.
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यात ज्योती पाटील यांच्यासोबत पक्षाचे विभाग प्रमुख योगेश निकम, विभाग प्रमुख संजय जाधव, विभाग प्रमुख रवी रसाळ यांच्यासह स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक उपस्थित होते.






