Homeठाणे-मेट्रोदिवेकरांसाठी आनंदाची बातमी! सततच्या पाठपुराव्याला यश; दिव्याला मिळाला स्वतंत्र पिनकोड

दिवेकरांसाठी आनंदाची बातमी! सततच्या पाठपुराव्याला यश; दिव्याला मिळाला स्वतंत्र पिनकोड

ठाणे: दिवा परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ‘आता तरी जागा हो दिवेकर’ आणि ‘भारतीय जनता पार्टी’च्या अविरत पाठपुराव्याला मोठे यश आले असून, केंद्र सरकारने दिव्यासाठी स्वतंत्र पिनकोड मंजूर केला आहे. या निर्णयाबाबत विजय भोईर यांनी समाधान व्यक्त केले असून दिवावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंब्रा पिनकोडच्या जाचातून सुटका
यापूर्वी दिव्यासाठी ४००६१२ हा मुंब्रा परिसरासोबतचा एकत्रित पिनकोड वापरला जात होता. एकाच पिनकोडमुळे दिव्याला अनेक तांत्रिक अडचणींना आणि प्रशासकीय विलंबाचा सामना करावा लागत होता. पोस्टल सेवा, शासकीय कागदपत्रे आणि डिलिव्हरी सेवांमध्ये यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण होत होता. आता दिव्याला ४००६११ हा नवीन आणि स्वतंत्र पिनकोड मिळाल्यामुळे या सर्व तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत.

दिव्याला स्वतंत्र पिनकोड मिळावा यासाठी भाजपाचे श्री. विजय अनंत भोईर हे गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांनी केंद्र सरकारकडे आणि संबंधित मंत्रालयाकडे अनेक निवेदने दिली, तसेच सातत्याने पत्रव्यवहार करून या समस्येचा पाठपुरावा केला. त्यांच्या या अथक प्रयत्नांची दखल अखेर केंद्र सरकारने घेतली असून दिव्याला एक स्वतंत्र ओळख मिळवून दिली आहे.
या यशाबद्दल परिसरातील नागरिकांनी श्री. विजय भोईर आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानले आहेत. नवीन पिनकोड लागू झाल्यामुळे दिव्याच्या विकासाला आणि प्रशासकीय कामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!