Homeशहर परिसरदिवा–शीळ रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा दिवा मनसेचा आरोप; चौकशीच्या मागणीसाठी 'खड्ड्यांची...

दिवा–शीळ रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा दिवा मनसेचा आरोप; चौकशीच्या मागणीसाठी ‘खड्ड्यांची शांती’ आंदोलन

दिवा : दिवा–शीळ रस्त्याच्या डांबरीकरण आणि प्रस्तावित काँक्रीटीकरणाच्या कामात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप दिवा मनसेने केला आहे. या कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच दिवा शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिवा शहर शाखेतर्फे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘खड्ड्यांची शांती’ हे उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.

दिवा शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी आणि नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप मनसेने केला. वारंवार तक्रारी करूनही ठाणे महापालिका प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी दिवा मनसेचे जिल्हा संघटक तुषार पाटील यांनी दिवा–शीळ रस्त्यावरील रखडलेल्या कामाबाबत महापालिका प्रशासनावर टीका केली. या रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांचा विरोध हे कारण सातत्याने पुढे केले जाते. मात्र, गेली १५ ते २० वर्षे जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नसताना त्यांनाच जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांना तातडीने योग्य मोबदला देऊन दिवा–शीळ रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा. यासाठी मनसेचे शिष्टमंडळ लवकरच इन्फ्रामॅन खासदारांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दिवा शहराध्यक्ष प्रशांत प्रभाकर गावडे यांनी २०१९ मध्ये डांबरीकरणासाठी ₹१६.८६ कोटींची निविदा, २०२२ मध्ये ₹३ कोटींची वाढीव तरतूद आणि डिसेंबर २०२४ मध्ये कामाला डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले. मात्र, त्याच कालावधीत ऑक्टोबर २०२४ मध्ये याच रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी ₹६२.६५ कोटींची स्वतंत्र निविदा काढण्यात आली. काँक्रीटीकरणाची निविदा अस्तित्वात असतानाही डांबरीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचे दाखवून सुमारे ₹२० कोटींची बिले काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात विधानसभा सचिव शरद पाटील, शहराध्यक्ष प्रशांत गावडे, महिला शहराध्यक्ष अंकिता कदम, शहर सचिव परेश पाटील, उपशहराध्यक्ष देवेंद्र भगत, किरण दळवी, प्रकाश पाटील, नम्रता खराडे, विभागाध्यक्ष देवदत्त घाडी, शैलेंद्र कदम, जयेश घरत यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!