आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नंदनवन येथे पक्षप्रवेश संपन्न
विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई : विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणाऱ्या घडामोडीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे, नगर परिषदेचे १९ नगरसेवक, तसेच अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष व कर्नाटकातील बेळगाव येथील अनेक पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
या प्रवेशामुळे दर्यापूर नगर परिषदेतील काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा असून विदर्भात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी बळकट झाल्याचे मानले जात आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. राज बोरकर, संदीप मेश्राम, सचिन कुंभारे, केतन सहारे, पंकज बोरकर आणि श्रीकांत रामटेके, प्रहारचे बेळगाव जिल्हाध्यक्ष शिवकुमार बोधले, बेळगाव तालुका अध्यक्ष दीपक बोधले, युवा अध्यक्ष बेळगाव जिल्हा रोहित पाटील, मांगुर शाखाप्रमुख सुरेश हेमाजे यांच्यासह अन्य पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्यांनी ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
मुंबई स्थित नंदनवन या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दर्यापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांना महायुती सरकारची संपूर्ण साथ राहील.”
शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत सांगितले की, विदर्भात सर्वसामान्य, शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यामुळे विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे वाढता ओढा हा जनविश्वासाचा पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र हे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असल्याची आठवण करून देत, गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच महायुती सरकारचे ध्येय असल्याचे सांगितले.
“विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला शिवसेनेत सन्मानाचे स्थान आहे,” असेही ते म्हणाले. प्रवेश सोहळ्यास विदर्भ व कर्नाटकातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शाखाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात सुरू असलेली संघटनवाढ आणि या सामूहिक प्रवेशामुळे आगामी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे बळ अधिक वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू, आमदार प्रा. मनीषा कायंदे, अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, यांच्यासह अन्न पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






