दिवा:- कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील दिवा शहरात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत गंभीर त्रुटी व अनियमितता होत असल्याचा आरोप करत कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे सखोल चौकशी करून सक्षम यंत्रणा उपलब्ध होईपर्यंत सदर प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याची मागणी केली आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांना ई मेल द्वारे दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, विशेष मतदार पुनरीक्षणाचा उद्देश मतदार यादीतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत कायम ठेवणे हा असला, तरी दिवा शहरात ही प्रक्रिया अत्यंत त्रुटीपूर्ण पद्धतीने राबविली जात आहे.
निवेदनानुसार, मतदारांच्या घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्याची जबाबदारी असलेल्या बी.एल.ओ. (Booth Level Officer) यांच्याकडून अपेक्षित पद्धतीने काम होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अनेक ठिकाणी बी.एल.ओ. प्रत्यक्ष मतदारांच्या घरी न जाता मतदारांनाच त्यांचा शोध घ्यावा लागत आहे. काही ठिकाणी शाळा तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये शिबिराच्या स्वरूपात ही प्रक्रिया राबविली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या कार्यपद्धतीमुळे अनेक पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचा मूळ उद्देशच धोक्यात आला आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, या प्रक्रियेचा लाभ नेमका कोणाला होत आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच, निवडणूक आयोगाची यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नसल्यास काही राजकीय पक्षांकडून या प्रक्रियेचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे खऱ्या व पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पुढील मागण्या केल्या आहेत—
* दिवा शहरात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी.
* वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दिवा शहरात येऊन पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी.
* सक्षम अधिकारी, पुरेसे बी.एल.ओ. आणि प्रभावी यंत्रणा उपलब्ध होईपर्यंत SIR प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात यावी.
* प्रत्येक पात्र मतदारापर्यंत प्रक्रिया पारदर्शकपणे पोहोचेल, याची खात्री झाल्यानंतरच SIR प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी.
“मतदार यादी हा लोकशाहीचा पाया आहे. कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये आणि निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व विश्वासार्ह राहावी, यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करावी,” अशी मागणी कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी केली आहे.






