Homeठाणे-मेट्रोशैलेश पाटील यांची 'दिवा शिवसेना केमिस्ट असोसिएशन'च्या अध्यक्षपदी नियुक्ती

शैलेश पाटील यांची ‘दिवा शिवसेना केमिस्ट असोसिएशन’च्या अध्यक्षपदी नियुक्ती

ठाणे:दिवा शहरातील मेडिकल व्यावसायिकांच्या समस्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अखेर ‘दिवा शिवसेना केमिस्ट असोसिएशन’ची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने आणि दिवा शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेची घोषणा करण्यात आली. या नव्या संघटनेच्या अध्यक्षपदी नगरसेवक शैलेश मनोहर पाटील तर उपाध्यक्षपदी भालचंद्र भगत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
दिव्यातील आकांक्षा हॉलमध्ये पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला २०० हून अधिक केमिस्ट व्यावसायिक उपस्थित होते. दिवा शहरात आजवर केमिस्टची स्वतंत्र संघटना नसल्याने स्थानिक मेडिकल चालकांना अन्न व औषध प्रशासनाशी (FDA) संबंधित बाबी, परवाने आणि व्यवसायातील इतर तांत्रिक अडचणींना एकट्याने सामोरे जावे लागत होते. या संघटनेमुळे आता सर्वांना संघटित बळ मिळाले आहे.
याप्रसंगी ठाणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप देशमुख आणि कल्याण केमिस्ट असोसिएशनचे खजिनदार गणेश शेळके यांनी उपस्थित व्यावसायिकांना फार्मसी कायद्यातील नियम व परवान्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित अध्यक्ष शैलेश पाटील यांनी, दिव्यातील मेडिकल चालक व मालकांच्या हक्कांसाठी आणि व्यवसायाच्या प्रगतीसाठी ही संघटना सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही दिली. लवकरच संघटनेच्या उर्वरित पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाणार आहे.

error: Content is protected !!