Homeठाणे-मेट्रोदिवा रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसाठी व दिवा ते सीएसटी लोकल चालू होण्यासाठी ठाकरेंच्या...

दिवा रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसाठी व दिवा ते सीएसटी लोकल चालू होण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे स्वाक्षरी अभियान

दिवा:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत व कल्याण जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास बामा मुंडे तसेच दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात दिवा स्टेशन येथे भव्य स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

दिवा, मुंब्रा, कळवा, डोंबिवली तसेच परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांना दररोज प्रचंड गर्दी, अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि प्रवासातील गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे अभियान आयोजित करण्यात आले.

या अभियानाद्वारे दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) थेट लोकल सेवा सुरू करणे तसेच कल्याण ते घाटकोपर दरम्यान सकाळी ५ वाजल्यापासून आणि सायंकाळी ६ वाजल्यानंतर उपनगरीय लोकल फेऱ्यांची संख्या वाढविणे या प्रमुख मागण्यांसाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या.

अभियानादरम्यान मोठ्या संख्येने रेल्वे प्रवाशांनी सहभाग नोंदवत आपल्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. अनेक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करत प्रवाशांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. संकलित करण्यात आलेल्या हजारो स्वाक्षऱ्या संबंधित रेल्वे प्रशासन व केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असून प्रवाशांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना संघर्ष सुरू ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

“एक स्वाक्षरी लाखो प्रवाशांच्या हक्कासाठी” या घोषवाक्याखाली पार पडलेल्या या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दिवा शहरातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर शिवसेना सातत्याने आवाज उठवत राहील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!